गोंदिया : पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १४ लाख रुपये प्रत्येकी बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट परिसरात ही चकमक उडाली. शुक्रवारी सुरू झालेली ही चकमक शनिवारी उशिरापर्यंत सुरू होती. घनदाट जंगलाचा फायदा घेत काही नक्षलवादी पळुन गेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हॉकफोर्सच्या पथकांनी परिसरातील शोध कार्य वेगाने सुरू केले आहे.
मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट परिसरात शुक्रवारी दुपारी ३ ते शनिवारी पहाटे ३ या काळात पोलिस आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. यात दलमच्या एरिया कमांडर आणि गार्ड असलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. दोघींवर प्रत्येकी १४-१४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या दोन्ही महिला नक्षलवादीं विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट पोलिसांनी दिली.
पोलिस महानिरीक्षक बालाघाट संजयकुमार, बालाघाट पोलिस अधीक्षक समीर सौरभ आणि हॉकफोर्सचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक समीर सौरभ यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, शनिवारी पहाटे ३ वाजता गढी ठाणे हद्दीतील कडला जंगलात हॉकफोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात जवानांनी सुनिता आणि सरिता या दोन महिला नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून बंदुका, काडतुसे, दारूगोळा, शस्त्रे व खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही महिला नक्षलवाद्यांवर प्रत्येकी १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.