वाशीम : मंगरूळपीर येथील बाबा हयात कलदंर दर्ग्यातील उरूसनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकविण्यात आले. केवळ दोन डीजेची परवानगी असताना २१ डीजे वाजविण्यात आले. याप्रकरणी दोन जणांना मंगरूळपीर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
वाशीमचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘नवस्वराज’शी बोलताना सांगितले की, सुरुवातीला या मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आल्याची अफवा उडाली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचे सर्व व्हिडीओ फुटेज तपासण्यात आले. बाहेरील व्यक्तींकडुनही व्हिडीओ फुटेजेस मिळविण्यात आलेत. त्याचीही तपासणी करण्यात आली. त्यात औरंगजेबाचे दोन पोस्टर झळकविण्यात आल्याचे तेवढे निष्पन्न झाले. पाकिस्तानचा कोणताही झेंडा मिरवणुकीत नव्हता. मात्र नियमांचे उल्लंघन केल्याने तत्काळ दोन जणांना अटक करण्यात आली. दोनच जण हे पोस्टर घेऊन नाचताना दिसत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रकारानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवार १५ जानेवारी २०२३ रोजी या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. पोलिस अधीक्षक सिंह याप्रकरणी म्हणाले की, ‘अशा प्रकारांची आड घेत जर कुणी शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी व कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसांना सूचना द्यावी.’