बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या एल्गार यात्रेला आज पासून दणक्यात सुरुवात झाली. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करत संत गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रे’ला सुरुवात केली.
दोन दिवस खामगाव तालुक्यात फिरून ही यात्रा समोर मार्गस्थ होणार आहे. सोयाबीन – कापसाला दरवाढ मिळावी तसेच येलो मोझॅक,बोंडअळीमुळे व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई मिळण्यासाठी व शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला बचत गट, तरुणांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
राज्य शासनाने केवळ ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. इतर तालुक्यांमध्ये शासनाला सर्वत्र हिरवेगार दिसत आहे का? असा संतप्त सवाल करत सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा. शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या शासनाने तातडीने गांभीर्याने घेत पूर्ण कराव्या यासाठी आता आरपारची लढाई लढणार असल्याचे या वेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. गावोगावी शेतकऱ्यांच्या भेटी, बैठका आणि सभा घेऊन शेतकरी व तरुणांची फौज एकत्र करत २० नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे भव्य महाएल्गार मोर्चा काढून शासनाची झोप उडवणार आणि सरकारच्या पायाखालची वाळू सरकणार असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली होती. त्यानुसार पाच नोव्हेंबर पासून या यात्रेला दणक्यात सुरुवात झाली.