अकोला : सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता रजेवर गेल्या आहेत. रुग्णांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी दुपारी सर्वोपचार रुग्णालय गाठून झाडाझडती घेतली.
महाविद्यालयाच्या कारभारावर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्ह्यासह बुलढाणा, अमरावती, वाशीम व हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना हेलपाटे होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करा, बंद यंत्रसामुग्री सुरू करा, सर्वसामान्य नागरिकांच्या संवेदना जाणून काम करा, अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या. अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांच्या कारभारासंदर्भात अनेक तक्रारींचा पाढा यावेळी वाचण्यात आला.
आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वोपचार रुग्णालयाला अकस्मात भेट दिली. त्यावेळी त्यांना अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये ८ ऑगस्टपासून सरकारी कार्यक्रमाच्या नावावर १७ ऑगस्टपर्यंत रजेवर आहेत, अशी माहिती देण्यात आली. प्रभारी नसल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे. अनेक रुग्णांनी गैरसोय होत असल्याची तक्रार केली. रुग्णालयाची अनेक यंत्र बंद अवस्थेत आहेत. तसे रुग्णालयातील गैरकारभाराबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली.