अकोला : विभक्ती, घटस्फोटांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक बालके आपल्या जन्मदात्यांचे प्रेम आणि सहवासाला मुकली आहेत. आई-वडिलांच्या संघर्षाने त्यांचे बालपण हिरावून घेतले असून त्याचा दुरगामी परिणाम त्यांच्या मनावर होतो.
वर्ल्ड ऑफ स्टॅस्टिकनुसार आपल्या देशात घटस्फोटाचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. काही अभ्यासकांचे मते ही टक्केवारी फसवी असून प्रमाण जास्त असल्याचा त्यांचा दावा आहे. मोठ्या शहरात तसेच तरूणांमधे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदू धर्माचा घटस्फोटाला विरोध असला तरी जैन व शिख धर्मात प्रमाण कमी आहे. तुलनात्मक दृष्ट्या देशात घटस्फोटाचे बाबतीत केरळ राज्य सर्वांत आघाडीवर असून उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा तसेच राजस्थान राज्याची टक्केवारी कमी आहे. मालदिव देश जगात प्रथम क्रमांकावर असून दर एक हजार लग्नांपैकी ६ जोडप्यांचा घटस्फोट होतो.
महाराष्ट्र राज्य देखील घटस्फोटाचे प्रमाणात मागे नाही, मुंबई कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०११ मध्ये मुंबईत घटस्फोट मिळवण्यासाठी दररोज २२ अर्ज प्राप्त झाले. दुसरे धक्कादायक असे की, कोरोना काळात कौटुंबिक न्यायालय ६ महिने बंद असतानाही दररोज १९ अर्ज न्यायालयात दाखल झाले. घटस्फोटाचे प्रकरणात मुंबई, पुणे त्यानंतर नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा क्रमांक लागतो.
एका अभ्यासाचे निष्कर्षानुसार जुळवून झालेले विवाह ९७ टक्के टिकतात तर प्रेमविवाह ९७ टक्के तुटतात. आंतर्जातीय तसेच आंतर्धर्मीय प्रेमविवाह तुटण्याचे प्रमाण जास्त आहे. विवाहाची परिणती घटस्फोटात होण्याची अनेक कारणे आहेत. महिलांची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती झाल्यामुळे त्या स्वावलंबी झाल्या आहेत. परस्परांबद्दल अविश्वास, आपुलकी, सुसंवाद तसेच जवळीकीचा अभाव या व्यतिरिक्त संसारात कुटुंबातील सदस्य व मित्र मैत्रिणींचा अतिरेकी हस्तक्षेप कारणीभूत आहे. आजची तरूण पिढी स्वच्छंदी असून आक्रमक स्वभावाची आहे. सहनशक्तीचा अभाव आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती नसल्यामुळे घटस्फोटाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढते आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे ४० टक्के मुले तर ३५ टक्के मुली विवाह करणे टाळतात. लग्नापेक्षा ते लिव्ह ईन रिलेशनशीप मध्ये रहाणे पसंत करतात. निरोगी कुटुंब आणि समाजव्यवस्थेसाठी हे अतिशय घातक आहे.