अमरावती : दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात १४व्या शतकापासून आजही दिमाखात उभी असलेली पायविहिर आता डाक विभागाच्या पोस्टकार्डवर आली आहे.
अमरावतीहून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आसेगाव पूर्णा ते दर्यापूर मार्गावर महिमापूर हे गाव आहे. याच गावात ही ऐतिहासिक विहीर आहे. संपूर्ण दगडाचे बांधकाम. चौकोनी आकार. खोली ८० फूट. रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ प्रशस्त पायऱ्या. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी. प्रवेशद्वारावर दगडात कोरलेली दोन लक्षवेधी पुष्पे. पायऱ्यांमध्ये क्षणिक विसाव्यासाठी टप्पे. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल अशी व्यवस्था. बांधकाम संपल्यावर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आतमध्ये दोन कोरीव ध्यानस्थ मूर्ती, अशी या विहिरीची रचना आहे. ही विहीर मुघलकालीन असल्याचा उल्लेख अमरावती जिल्ह्याच्या ‘गॅझेटियर’मध्ये आहे. केंद्रीय टपाल विभागाने भारतातील ऐतिहासिक अशा पायविहिरींचे निरीक्षण केले, त्यातून महाराष्ट्रातील आठ विहिरींचा समावेश टपाल पुस्तिकेत केला आहे.