अकोला : शासकीय यंत्रणेने गतिमान पद्धतीने काम करावे असे आवाहन करीत अकोल्याचे नवीन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कामात कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुंभार यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर कुंभार यांनी महसूल विभागातील सर्व विभागांचा आढावा घेतला.
कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर कुंभार यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारचे कर्मचाऱ्यांचे वर्तन खपवून घेतल्या जाणार नाही. पात्र असलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ तत्काळ देण्यात येईल. नियमांच्या चौकटीत बसल्यानंतरही एखाद्या नागरिकाची अडवणूक होत असल्यास असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही असेही कुंभार म्हणाले. पात्र नसलेल्या व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देणे हे चुकीचे आहे. त्यामुळे असा प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
शेती संबंधीचे प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार, पोकरा सारख्या विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देऊ. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासारखी मोठी संस्था अकोल्यात असल्याने तेथील तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून पुढील कालावधीत सकारात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न राहील.अनेक ठिकाणी गाळ, अतिक्रमणासह अन्य कारणांमुळे पुराचे पाणी शेती, घरात शिरते. परिणामी नुकसान हाेते. हे टाळण्यासाठी उपाय याेजना आवश्यक असून, यासाठी सप्टेंबरपर्यंत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकरी कुंभार म्हणाले. पत्रकार परिषदेला जिल्हा माहती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.