अकोला : भारतात मोठ्या प्रमाणात प्रतिभावान युवा शक्ती आहे, ज्यांच्यात देश घडवण्याचे सामर्थ्य आहे. युवापिढीला योग्य दिशा दाखवणे त्यांना चांगल्या कामासाठी प्रेरीत करणे हि राष्ट्रहित चिंतणाऱ्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. देशातील नामंकित खेळाडू आणि सिनेकलावंतांचे तरूण मोठे प्रशंसक आणि चाहते आहेत. त्यांची रहाणी, केश व वेशभूषेचे ते अनुकरण करतात. काही तर त्यांची पूजा करतात त्यांचा शब्द प्रमाण मानतात.
अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि अजय देवगण यांनी तरूणांना वेड लावले आहे. बच्चन यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ ‘पद्मभूषण’ ‘ पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तेंडुलकर यांचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तर देवगण यांना त्यांच्या चित्रपटांसाठी चार वेळ ‘राष्ट्रीय फिल्म पुरस्कार’ देण्यात आला आहे. दोघे चित्रपट सृष्टीतील तर एक क्रीडाक्षेत्रातील ख्यातनाम आहे. देशाने त्यांना भरभरून प्रेम आणी सन्मान दिला आहे.
तिघेही भरपूर संपत्तीचे धनी आहेत. असे असतानाही सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट ऑनलाईन गेमींग अॅपची जाहिरात करतात, अजय देवगण जंगली रमीची व पान मसाल्याची तर अमिताभ बच्चन साॅफ्टड्रींक व मॅगीच्या जाहिरातीत दिसतात. या व्यतिरिक्त अनेक हिंदी, मराठी सिनेकलावंत जंगली रमी, पेप्सी व पान मसाल्याची जाहिरात करतात. ऑनलाईन गेम तसेच रमी हा एकप्रकारचा जुगार आहे तर पानमसाला आणि शितपेय मनुष्याच्या प्रकृतीसाठी हानीकारक आहेत. ख्यातनाम व्यक्तींनी अशा जाहिराती केल्यास त्याचा विपरीत परिणाम तरूणांच्या मनावर आणि प्रकृती होऊ शकतो.
सामाजिक बांधिलकी आणि दायित्व समजून नामंकित खेळाडू सिनेकलावंत तसेच अन्य कुठल्याही क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तीने समाज आणि तरूणपीढीची दिशाभूल करणाऱ्या, प्रकृतीस हानीकारक असलेले पेय, पदार्थ अथवा वस्तूंची तसेच फसव्या जाहिराती करू नये, अशी देशाच्या हितचिंतक नागरीकांची मागणी आहे.