अकोला : केंद्र व राज्य सरकारची पोलखोल करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून चला होऊ द्या चर्चा ही मोहिम राबवण्यात येणार आहे. शनिवारपासून मोहीम सुरू होणार असून, जवळपास ९०० गावांमध्ये बैठका घेण्याचे नियोजन आहे. प्रत्येक तालुक्यासाठी १० टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा यानिमित्ताने भाजप व शिवसेनेत राजकीय कुरघोडी रंगणार आहे.
भाजपने जनतेला खोटी आश्वासने दिली असून, अकोलेकरांना जगण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांसह सामान्य जनता कधी नव्हे तेवढी संकटात आहे. त्यामुळे होऊ द्या चर्चा, या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराची पुराव्यासह पोलखोल करण्यात येईल, असे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी स्पष्ट केले. वाढलेली महागाई, इंधन, गॅस सिलिंडरचे भडकलेले भाव, बेरोजगारी, घरकुलसह योजना आदींबाबत भाजपने दिलेली आश्वासने व प्रत्यक्ष स्थिती यावर चर्चा होणार आहे.
अतिवृष्टीमुळे पीक, शेत जमिनीची हानी झाली असून, या नुकसानीची न मिळालेली मदत, बियाणे, खतांची कृत्रीम टंचाई, पाणी टंचाई, रस्त्यांची दुरावस्था, रखडलेले सिंचन प्रकल्प, विकास कामांना दिलेली स्थगिती आदींवर टीकास्त्र डागण्यात येणार आहे.