अकोला : उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू होताच ठाकरे गटाचे नेते राजेश मिश्रा यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं. अत्यंत थातुरमातुर पद्धतीनं ही दुरूस्ती करण्यात आली असून त्यामुळं अपघात घडू शकतो असं त्यांचे म्हणणं आहे.
शुक्रवारी (ता. २७) मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांनी उड्डाणपुलावर ‘हा पहा भाजपचा भ्रष्टाचार’ असे लिहुन भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. बराचवेळपर्यंत अशोक वाटिका चौकात हे आंदोलन सुरू होतं. या मार्गावरून जाणे-येणे करणाऱ्या प्रत्येकाचेच आंदोलकांनी लक्ष वेधलं. मिश्रा यांच्यासह अकोला पूर्व शहरप्रमुख राहुल कराळे, अतुल पवनीकर, मंगेश काळे, गजानन बोराळे, देवेश्री ठाकरे, श्याम पांडे या आंदोलनात सहभागी झालेत.
अकोला आणि अकोटला जोडणारा पूर्णा नदीवरील पूलही पहिल्याच पुरामुळं वाहुन गेला. गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन पूल कालबाह्य झाल्याने बंद करण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन जवळच छोटा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल बांधण्यासाठी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या विकास निधीतून चार कोटी रुपये मंजूर केले होते. या मुद्द्यावरही ठाकरे गटानं चांगलंच रान पेटवलं आहे. गडकरींनी जे दिलं ते अकोल्यातील नेते टिकवू शकले नाही, अशी टीका आता जनतेतूनही होत आहे.