Home » सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करणार : फडणवीस 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करणार : फडणवीस 

by नवस्वराज
0 comment

अकोला : आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून, अकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. गरजूंना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी निधीची उणीव पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे दोनदिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ, सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या नूतन इमारतीचे तसेच शिवापूर येथील उपजिल्हा रूग्णालयाचे भूमिपूजन व बोरगाव मंजू येथील ग्रामीण रूग्णालयाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमोल मिटकरी , जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, माजी आमदार डॉ. रणजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी अजित कुंभार, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोरोना संकटानंतर आरोग्य यंत्रणेत सुधारणेची गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अडीच लाख आरोग्य केंद्र निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्यांना निधी उपलब्ध करून दिला. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे असा निर्णय शासनाने यावर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला. त्यामुळे १४ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे, इतर जिल्ह्यांतील पूर्वीच्या महाविद्यालयांचे आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

अकोला येथील रूग्णालयात वॉर्डसाठी ६५ कोटी व बाह्य रूग्ण विभागाासाठी ८५ कोटी असा एकूण १७० कोटी रूपये निधी देण्यात आला. त्याचप्रमाणे, रूग्णालयांच्या दीर्घकालीन विकासासाठी ९५० कोटी रूपयाच्या निधीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल करण्यात येत आहेत. अतिविशेषोपचार रूग्णालयासाठी केंद्र शासनाने १२० कोटी व राज्य शासनाने ४० कोटी रुपये निधी दिला. प्रधानमंत्री जनविकास योजनेतून ४६ कोटी रूपये निधीतून १०० खाटांचे शिवापूर येथे उपजिल्हा रूग्णालय, तसेच बोरगाव मंजू येथे ग्रामीण रूग्णालय निर्माण होणार आहे. सर्वोपचार रूग्णालयालाही निधी मिळवून दिला जाईल, असे फडणवीस म्हणाले.

सर्व प्रकारच्या ‘स्पेशालिटी’ एकत्र आणून गरजूंचे स्क्रिनींग, तपासणी व उपचार मिळवून देण्यासाठी महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरातील एकही रूग्ण उपचारांविना परत जाणार नाही. गरजूंना शस्त्रक्रियेपर्यंतचे आवश्यक उपचार गरज पडल्यास खासगी रूग्णालयांतूनही मिळवून देऊ. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंत विनामूल्य उपचार सर्वांना लागू करण्यात आले आहेत. खासदार संजय धोत्रे व आमदार गोवर्धन शर्मा यांचा महाआरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी नेहमी आग्रह राहिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात विकासकामांना चालना

आपण जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले तरी ‘पालकत्व’ सोडलेले नाही, अशी ग्वाही देऊन ते म्हणाले की, अकोला शहरासाठी वाढीव पाणीपुरवठ्यासाठी जिगाव प्रकल्पातून ३२ दलघमी पाणी मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. अटल अमृत योजनेत ९२१ कोटी, तसेच मलनि:स्सारण १ हजार ६७४ कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री ई-बस योजनेत शहरात इलेक्ट्रिक बसही सुरू होणार आहेत. ग्रामसडक योजनेत १६० कोटी रूपये निधीतून २०० किमी रस्ते बांधण्यात येणार आहेत. ३६ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

‘पोकरा’च्या दुस-या टप्प्याला ६ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. श्री राजराजेश्वर मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल.

आरोग्य सुविधांची निर्मिती : विखे पाटील

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, अकोला हे मेडिकल हब होताना सर्वसामान्यांना परवडणा-या उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांचे बळकटीकरण करण्यात येईल. आरोग्य क्षेत्राचे महत्व ओळखून राज्यात विविध सुविधा व सेवा निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाआरोग्य शिबिराचा ३० हजारहुन अधिक गरजूंना लाभ होणार आहे, असे आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वारे यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आभार मानले.

महाआरोग्य मेळाव्यात विविध प्रकारच्या आजारांबाबत तपासणी, निदान करण्यासाठी १५ हून अधिक कक्ष समाविष्ट आहेत. आवश्यक तपासण्या व निदानानंतर संबंधितांना योग्य उपचारही मिळवून देण्यात येणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय याबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशन व विविध आरोग्य संस्थांचे सहकार्य लाभले आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत पाचमजली असून विविध कक्ष २३८ खाटा व अद्ययावत साधनांनी सुसज्ज आहेत. गरजू रूग्णांसाठी अतिविशेषोपचारांची सुविधा निर्माण झाली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!