Home » Nagpur NDDC Bank : माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा!

Nagpur NDDC Bank : माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा!

by नवस्वराज
0 comment

Nagpur | नागपूर : बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँक (NDCC) घोटाळा प्रकरणात न्यायालयाने बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

नागपूर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. घोटाळा उघडकीस आल्याच्या तब्बल 22 वर्षांनंतर शुक्रवारी (ता. 22) न्यायालयाचा हा निकाल दिला. घोटाळ्यातील आरोपी मुख्य रोखे दलाल केतन शेठ, तत्कालीन बँक व्यवस्थापक अशेाक चौधरी, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांनाही शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. त्यांनाही पाच वर्षे तुरुंगात राहावे लागणार आहे. केदार हे घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. (Sunil Kedar Sentence Jail For Five Years In Nagpur District Bank Sacam Case)

खटल्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले-पूरकर यांनी 28 नोव्हेंबर 2023 रोजी याप्रकरणातील निकाल राखून ठेवला होता. निकालातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी हा निर्णय न्यायालयाने घेतला होता. निकालातील त्रुटी दूर झाल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला. सुनील केदार यांच्यासह उर्वरित सर्व आारोपी नागपूर येथील न्यायालयात सकाळीच हजर झालेत. कामाला सुरुवात झाल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनील केदार यांच्यासह केतन शेठ (मुख्य रोखे दलाल), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर), अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांना दोषी ठरविले.

केदार यांच्या वकिलांनी केदार यांना कमीत कमी शिक्षा व्हावी, यासाठी जोरदार ताकद लावत युक्तीवाद केला. केदार हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने निकाल देताना त्याचा विचार केला नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!