अकोला : शाळेत शिकायला जाण्यासाठी अकोट तालुक्यातील वडाळी देशमुख येथील चिमुकल्यांना पुराच्या धोकादायक पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. चिमुकले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून शाळा गाठत आहेत.
पावसाळ्यात बोर्डी नदीला पूर येतो. नदीवर पूल नसल्याने चिमुकल्यांना शिक्षणासाठी नदी पार करण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या आठवड्यापासून अकोल्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. वडाळी देशमुख येथील बोर्डी नदीला पूर आला की छत्रपती शिवाजीनगर येथील मजूर वर्गाचा संपर्क गावापासून तुटतो. त्यामुळे गावातील मुलांना पूर असलेली बोर्डी नदी पार करून शाळेत जावे लागत आहे.