अमरावती : शेतात राबताना अनेक महिला बैलगाडी देखील हाकतात. यात अमरावतीच्या तळेगावातील एक तरुणी अशीही आहे जीने यूपीएससीचा अभ्यास करताना बैलगाडा शर्यतीचा सराव केला आणि ही शर्यत जिंकलीही. उन्नती लोया हे या तरुणीचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील नागपूर महामार्गावर तळेगाव दशासर हे गाव. शंकरपटाचे गाव म्हणून तळेगावची ओळख आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे शंकरपट होतात. कृषक सुधार मंडळाने यंदा येथे महिलांच्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. २३ वर्षीय उन्नती लोयाही या शर्यतीत स्पर्धक होती. आधी कायदेशीर बंदी आणि त्यानंतर कोविड महासाथीमुळे नऊ वर्षांनंतर ही शर्यत होणार होती. त्यामुळे पंचक्रोशित चांगलीच चर्चा होती.
स्पर्धेला सुरुवात झाली आणि अवघ्या १३ सेकंदात उन्नती लोयाने अंतर पार करीत विजय मिळविला. उन्नती नागपूरमध्ये यूपीएससीचा अभ्यास करीत आहे. १३ सेकंदात शंकरपट जसा जिंकला तगदी तशाच पद्धतीने परिश्रमातून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे, असे उन्नतीचे ध्येय आहे.