Home » भारनियमन थांबवित अकोल्याकडे विशेष लक्ष द्यावे

भारनियमन थांबवित अकोल्याकडे विशेष लक्ष द्यावे

सनातन संस्कृती महासंघाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

by नवस्वराज
0 comment

अकोला : विजेची वाढलेली मागणी आणि वार्षिक देखभालीसाठी कोराडी येथील ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन विद्युतनिर्मिती संच बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीतर्फे काही ठिकाणी आपत्कालीन भारनियमन करण्यात येत आहे. अकोल्यातही हे भारनियमन होत आहे. अकोलेकरांवर लादण्यात आलेले भारनियमन तातडीने बंद करून अकोला जिल्ह्याकडे विशेष लक्ष पुरवावे, अशी मागणी सनातन संस्कृती महासंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ऊर्जामंत्री व पालकमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या अकोल्यात फिडर जी-एक, दोन आणि तीनवर वेळीअवेळी आपत्कालीन भारनियमन राबविण्यात येत आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते. परंतु भारनियमनाचे चटके मात्र विदर्भालाच सोसावे लागतात. त्यातही अकोल्याला त्याची सर्वाधिक झळ पोहोचते. वीज गळती, वीज चोरीचे कारण पुढे करून हे भारनियमन दरवेळी अकोल्यावर लादण्यात येते. अनेक वर्षांपासून महावितरणचे या वीज चोरी व गळतीकडे दुर्लक्ष आहे. चोरी पकडण्यासाठी गेलेल्या काही अधिकाऱ्यांना प्रसंगी राजकीय विरोध व दडपशाहीचाही सामना करावा लागतो. त्यामुळे अधिकारीही अशी कारवाई करण्यास धजावत नाही, याकडेही निवेदनातून फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.

रस्ते, वीज, पाणी पुरवठा, मूलभूत सुविधा, उड्डाणपूल, अंडरपास, अधिकाऱ्यांची नेमणूक आदी अनेक बाबतीत अकोला भकास झाले आहे. महापालिकेच्या कराच्या बोझ्याखाली अकोलेकर दबत आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी हे चित्र पूर्णत: बदलावे यासाठी अकोला जिल्ह्याकडे पूर्णवेळ विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही सनातन संस्कृती महासंघाने आपल्या निवेदनातून फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!