दीपक शर्मा
अकोला : अकोट-अकोला शटल रेल्वे सेवेच्या कामाने आता वेग घेतला आहे. खासदार संजय धोत्रे यांनी याबाबत पाठपुरावा केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी हा मुद्दा उचलून धरला. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांनीही जोरकस प्रयत्न सुरू केले. त्यामुळे आता रेल्वे विभागाकडुन अकोट-अकोला शटल रेल्वे सेवेसाठी कामाला सुरुवात झाली आहे.
अकोट-अकोला शटल रेल्वे सेवा लवकरच सुरू करायची आहे. त्यामुळे आवश्यक ती सर्व माहिती तातडीने पुरविण्याचे आदेश दक्षिण मध्य रेल्वेने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात एक पत्र दक्षिण मध्य रेल्वेने शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले आहे. शटल रेल्वे सेवेच्या मार्गातील सर्व तात्पुरते आणि कायमस्वरूपी वेग मर्यादेची माहितीही मागविण्यात आली आहे. अकोल्यातील लोकप्रतिनिधींनी आता अकोट-अकोला शटल सेवा सुरू करण्याबाबत सुरू केलेला पाठपुरावा आता सैल पडू देऊ नये, अशी अकोला आणि अकोट या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांची मागणी आहे.