अकोला : तब्बल साडेचार दशकानंतर राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. धीरज लिंगाडे यांनी अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघात विजय प्राप्त करीत या इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की ‘हिस्ट्री रिपीट्स’.
सत्तरीच्या दशकात विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ अस्तित्वात होता. यावेळी या मतदारसंघात जनसंघाचे वर्चस्व होते. १९७१-७२ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रामभाऊ लिंगाडे यांनी लढविली होती. त्यावेळी ते पराभूत झाले होते. मात्र या पराभवाचे उट्टे त्यांनी १९७८ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या अकोला-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने काढले. यानंतर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या सरकारमध्ये ते राज्यमंत्री झालेत. विधानपरिषद सदस्य झाल्यावर रामभाऊ लिंगाडे हे गृहखात्याचे राज्यमंत्री होते. आता त्यांचे सुपुत्र धीरज यांनी माजी गृहराज्यमंत्र्यांचा पराभव केला आहे. आमदार म्हणून ४५ वर्षांनी धीरज यांना विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.