अकोला : दोन दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने प्रकल्पाच्या जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. नियमित पाण्याची उचल केल्या नंतरही जलसाठा स्थिरावला आहे. परंतु जलसाठ्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.
जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि २४ लघु प्रकल्प आहेत. यामुळे अकोला शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा होतो तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली येते. मात्र यावेळी पावसाने जुन महिन्यात दडी मारली. जुलैच्या प्रारंभी देखिल पावसाने हजेरी लावली नाही. मात्र आता गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली नसली तरी नियमित उचल सुरु असतानाही पातळी स्थिरावली आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासह विविध गावांना पाणी पुरवठा होतो. प्रकल्पातून शहरासाठी दररोज ८ कोटी लिटर पाण्याची उचल केली जाते. नियमित होणारी उचल आणि बाष्पीभवन होत असतानाही काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पाचा जलसाठा स्थिरावला आहे. तर काही प्रकल्पात किंचित वाढ झाली आहे. एक जुन पासून आता पर्यंत काटेपूर्णा प्रकल्पावर १९ मिलिमिटर, वान प्रकल्पावर ३० मिलीमिटर, मोर्णा प्रकल्पावर ८१ मिलीमिटर, उमा प्रकल्पावर १.१० मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर निर्गुणा प्रकल्पावर एक जुन पासून पावसाची नोंद झालेली नाही.