नागपूर : वेळीच थांबा अन्यथा तुमचा दाभोळकर करू..’, अशी धमकी प्रा. मानव यांना आली आहे. त्यामुळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मानव यांच्या परिवारालाही धमकी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आपण अशा प्रकारांना भीक घालत नाही, असे ते म्हणाले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ३० लाख रुपयांचे आव्हान स्वीकारले आहे. त्यानंतरही धीरेंद्र महाराज आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस पेटत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच संतदेखील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाठीशी उभे झाले आहेत. मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण महाराज आणि प्रा. मानव यांच्यातील आव्हानात्मक संघर्षानंतर प्रा. मानव यांना धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यामुळे श्याम मानव यांच्या जीवितास कुठलाही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रा. श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनाही प्रा. मानव यांच्यानंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आचार्य शास्त्री यांना आधीच पोलिस सुरक्षा आहे. त्यानंतरही त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आचार्य शास्त्री यांच्यावतीने छत्तरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आम्ही एफआयआर दाखल केल्याचे छत्तरपूर पोलिसांनी स्पष्ट केले. शास्त्री यांना आधीच सुरक्षा आहे, असे मध्य प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले. धमकीबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही शास्त्री यांच्या सुरक्षेत वाढ केल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले.