Mumbai : राज ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) सोडून साधारणपणे दोन दशकं होऊन गेली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर जगजाहिर आहे. दोघेही एकमेकांसमोर येणे टाळतात. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर प्रखर टिका केली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Sharmila Thackeray criticized Uddhav Thackeray)
विक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ज्या माणसामुळे शिवसेनेतील मोठ्या नेत्यांना बाहेर पडावे लागले, त्या माणसाच्या हातून पक्ष निसटला आहे. या महिन्याच्या 10 तारखेला एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेची मान्यता दिली. या निकालावरुन शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. दिशा सॅलियन प्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली. मात्र आमदार अपात्रता निकालानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेंव्हापासून दोन्ही कुटुंबातील राजकीय वाद सार्वजनिक व्यासपीठावर दिसून आला आहे.