बुलडाणा : अतिवृष्टी आणि पुरामुळे बुलडाणा जिल्ह्याची दाणादाण उडाली आहे. पूर ओसरला असला तरी जगण्याचा संघर्ष कायम आहे. नेत्यांच्या दौऱ्यांमधून धीर दिला जात आहे. परंतु ठोस मदत अद्यापही न मिळाल्याने नुकसानग्रस्त चिंतेत आहेत. संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला. आलेवाडी या गावाला आठवडाभरात दोनदा पुराचा फटका बसला.
मलकापूर, नांदुरा, जळगाव-जामोद, संग्रामपूर, शेगाव या पाच तालुक्यांमध्ये १९ व २० जुलै रोजी तब्बल २० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. मलकापूर शहर तर जलमय झाले होते. २१ व २२ जुलै रोजी पुन्हा जळगाव-जामोद व संग्रामपूरमध्ये पावसाने कहर केला. जळगाव-जामोद शहराची परिस्थिती फार बिकट झाली होती. पाचही तालुक्यांमध्ये असलेल्या २६पैकी २३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पुरामध्ये अडकलेल्या रहिवाशांसाठी एसडीआरएफला बोलवावे लागले होते. तब्बल ४३४ गावांमध्ये महापुराचा थेट फटका बसला. यात मलकापूर ७८, नांदुरा ७२, शेगाव ७७, संग्रामपूर १०५ व जळगाव जामोद मधील १०२ गावांचा समावेश आहे. पुरामुळे ५,६७० कुटुंब बाधित झाले असून ७,११५ घरांची पडझड झाली आहे. त्यापैकी ४१८ घरे ही पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत.
जूनमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्याही लांबल्या. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील साडेसात लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरा शेतकऱ्यांनी केला. यातील १ लाख ५३ हजार २९४ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १४ हजार हेक्टर जमीन खरडून गेली. ८४ लहान आणि १३४ मोठी जनावरे दगावली आहेत. शासनाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. अजूनही हे काम सुरूच असून हे आकडे वाढण्याची शक्यता आहे.