चंद्रपूर : आपला बाप थकला आहे, तरीही ओझं वाहतोय, हे या चिमुकल्याला बघवलं नाही. वडिलांच्या पाठीवरील ओझं या चिमुकल्याने आपल्या पाठीवर घेतले आहे. अन तोऱ्यात शेताकडे निघाला.
मागील वर्षी जून महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. सलग सहा पुरांचा फटका जिल्ह्याला सोसावा लागला होता. सलग तीनदा बळीराजावर पेरणी करण्याची वेळ आली होती. या संकटाला तोंड देत बळीराजाने शेती फुलवली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस होईल हा अंदाज शेतकऱ्यांनी बांधला. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात शेतीची मशागत केली. मात्र पाऊस रुसला. जून महिन्याच्या शेवटचा आठवडा आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. बळीराजाने पेरणी उरकली. पेरणी झाली आणि पाऊस गायब झाला.
कापूस पिकालाही पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या कापसाची फवारणी सुरू आहे. मजुरांची कमतरता असल्याने शेतकरी कुटुंब शेतात राबताना दिसत आहे. अगदी पहाटेपासून तर दिवस संपेपर्यंत शेतकरी शेतात राबत असतात. रोज शेतात राबून थकून येणाऱ्या बापाला बघून चिमुकल्या शेतकरी पुत्राचा जीव कासाविस झाला. आपल्या वडिलांच्या खांद्यावर असलेला फवारणी पंप आपल्या पाठीवर घेऊन जात असलेला हा चिमुकला बोरगाव पोंभुर्णा मार्गावर दिसून आला. या मार्गाने जाणारे अविनाश वाळके या तरुणाने या मुलाच्या व्हिडिओ केला. हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या मुलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.