Mumbai | मुंबई : शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील 146 खासदारांच्या निलंबनावर कडाडून टीका केली आहे. काँग्रेसलाही त्यांनी गर्भीत सल्ला दिला आहे. इंडिया (INDIA) आघाडीच्या बैठकीनंतर ते म्हणाले की, देशात स्वातंत्र्याचे हनन सुरू आहे. हा लोकशाहीचा नरसंहार आहे. महागाई तसेच बेरोजगारी सारख्या मुद्द्यांवर संसदेत बोलू दिले जात नाही, असेही राऊत यांनी सांगितले. ( Sanjay Raut Harshly Criticized On Suspension Of MP Also Given Suggestion To Congress)
इंडिया आघाडीची बैठक पार पडल्याचे सांगत राऊत म्हणाले की, देशातील हुकूमशाही प्रवृत्तीविरूद्ध लढा देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. तो प्रत्यक्षात कसा उतरणार हा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. हुकूमशाहीचा अंत होऊन लोकशाही वाचावी, स्वातंत्र्याचे हनन थांबावे असे सर्वांना वाटते. मात्र त्यासाठी त्याग करण्याची कोणाचीही तयारी नाही. प्रादेशिक पक्ष आपली सुभेदारी सोडण्यास तयार नाही. त्यामुळे या हुकूमशाही विरोधी लढ्यात काँग्रेसलाच त्याग करावा लागेल. काँग्रेसलाच ताठरपणाची भूमिका सोडण्याचा गर्भीत इशारा संजय राऊत यांनी दिला. इंडिया आघाडीत सर्व व्यवस्थित असल्याचे वरकरणी दिसत असले तरी आघाडीत अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याचे राऊत यांच्या बोलण्यातून दिसले.