Buldhana : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावरून छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा होत असताना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी भुजबळ यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.
“छगन भुजबळ हे मराठा समाजाच्याविरोधात तिरस्काराची भावना ठेवून बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, त्यांची हकालपट्टी करावी. मंत्रिपद घेताना सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली जाते, अशावेळी भुजबळ एका समाजाचा तिरस्कार कसा काय करू शकतात?”, असा प्रश्न संजय गायकवाड यांनी उपस्थित करत टीका केली. मागील 70 वर्षांत मराठा समाजाच्या नोंदी दाबून ठेवल्या त्यामुळे समाजाचे नुकसान झाले. जर मराठा समाजाच्या नोंदी मिळत असतील तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असेही संजय गायकवाड म्हणाले.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील. त्यांच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीही फरक पडत नाही. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका नाही, असाही आरोप संजय गायकवाड यांनी केला.
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील मराठा मोर्चाला संबोधित करताना मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणासाठी झटत असल्याचे दिसले. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करत असल्यामुळे ते मराठा समाजाच्या निशाण्यावर आहेत.