अकोला : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या अकोला जिल्ह्यातही स्वराज्य पक्षानं तगडं आव्हान उभं करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटना स्थापन केली. त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून २०२४ च्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याचाच भाग म्हणून पक्षविस्तार आणि बांधणीलाही सुरुवात केली आहे.
स्वराज्य संघटनेचे राज्य सचिव आणि विदर्भ प्रभारी भुजंग काळे यांनी अकोला येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करतानाच स्वराज्य पक्षाचा लवकरच जिल्ह्यात विस्तार होणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने गुरुवारी स्वराज्य पक्षाची प्राथमिक बैठक स्थानिक शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्यावेळी काळे बोलत होते. स्वराज्य पक्षाला विदर्भात तरुणवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळत असून कोणताही राजकीय वारसा नसणाऱ्या तेजस्वी तरुणाईला प्राधान्य देण्यावर आमच्या पक्षाचा भर असून साक्षात संभाजीराजे यांचे नेतृत्व ग्रामीण तरुणाईला न्याय देऊन व्यवस्थेला ताळ्यावर नक्कीच आणेल असा विश्वासही भुजंग काळे यांनी व्यक्त केला.
स्वराज्य पक्षाचा पहिला वर्धापन दिन येत्या २७ ऑगस्ट रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी १० वाजता होणार असून त्याला विदर्भातील ५ हजारावर मावळे उपस्थित राहतील असेही काळे यावेळी म्हणाले. यावेळी इंद्रजित देशमुख,आकाश दांदळे उपस्थित होते.