अकोला : दरवर्षी मकरसंक्रांत दरम्यान पतंग उडवणाऱ्यांचा उत्साह शिगेला जातो. बंदी असतांनाही नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अनेक नागरिकांना दुखापत झाली आहे. आश्रय नगरातील तीन वर्षीय बालकाचा मांजामुळे गळा कापला गेला आहे. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाले आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांची माहिती प्रशासनास आहे. परंतु प्रशासन हेतुपूर्वक कारवाई टाळात आहे, असा आरोप करीत संभाजी ब्रिगेडने प्रशासनाला ईशारा दिला आहे.
अकोला शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे तेथे देखील अपघात घडत आहेत. अकोला महानगर व लगतच्या खेड्यांमध्ये नायलॉन मांजाचा मोठा साठा आहे. बंदी असतानाही साठा करून विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सव आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे महानगर जिल्हा प्रमुख योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले, महानगर उपाध्यक्ष पंकज बाजोड, उपशहर प्रमुख संदीप उपरवट, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश माकोडे, जिल्हा उपाध्यक्ष देवानंद साबळे, ओम वानखडे, कुशल जैन, सोशल मीडिया प्रमुख हर्ष कुरवाडे, ईश्वर भोयलू, शुभम वाकोळे, चेतन तोडकर, सागर भिरड, हरीश बोन्डे, पवन लाळे, रणजित राजगुरू, मनोज इंगळे, दीपक काटे, परीक्षित ढोरे, रितेश श्रीवास्तव, आदित्य मेहेरे, राम ढोरे आदी यावेळी उपस्थित होते.
डाबकी रोडवर ५० किलो मांजा जप्त
संभाजी ब्रिगेडने निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या नेतृत्वात डाबकी रोड भागातील भगतवाडी येथे कारवाई करीत ५० किलो नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. मांजा विकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईही केली आहे. शहरात आणि जिल्ह्यात कारवाई करण्याचे आदेशही अरोरा यांनी दिले आहेत.