Akola | अकोला : शालेय विद्यार्थ्यांवर नाताळ सण साजरा करण्याची जबरदस्ती करण्यात येते. त्याविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवार 22 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मिशनरी तसेच अन्य कॉन्व्हेंट शाळात 25 डिसेंबरला नाताळ साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना सांता क्लॉजसारखी वेशभूषा करण्याचे तसेच क्रिस्मस-ट्रीची प्रतिकृती बनवण्यास सांगितले जाते. या झाडाच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यास देखील सांगितले जाते. हिंदू धर्मात जीवंत वृक्षांचे पूजन केले जाते. शाळांमध्ये हिंदू धर्माचे विद्यार्थ्यीदेखील शिक्षण घेतात. त्यांना अशी जबरदस्ती करण्यात येऊ नये. राम नवमी, कृष्ण जन्माष्टमी, नवरात्री उत्सवही या शाळेत साजरे केले जात नाहीत. (Sakal Hindu Samaj Opposed In Akola Against Forceful Celebration Of Christmas In School)
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिक्षणाच्या नावाखाली हिंदू धर्मावर आघात करणे सुरू आहे. देशात प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचा तसेच त्यानुसार सण साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शाळेत अन्य धर्मीय विद्यार्थ्यांना अशी सक्ती करणे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्याविरूद्ध आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची अनुमती घेण्यात यावी. निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.