नागपूर : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी लागणारी सागवान लाकडाची पहिली खेप चंद्रपुरातून रवाना झाली आणि यानिमित्त भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. चंद्रपुरातून सुमारे १ हजार ८०० क्युबिक मीटर सागवान अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी जाणार आहे. या सागवानचे आपले एक खास वैशिष्ट्य आहे.
२९ मार्च २०२३ रोजी सागवान काष्ठ चंद्रपूर येथुन अयोध्येकडे रवाना झाले. या सोहळ्यामुळे चंद्रपूर ते बल्लारपूर या दोन शहरांमध्ये सगळे वातावरण राममय झाले होते. अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर होणार आहे आणि विशेष म्हणजे यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची निवड करण्यात आली आहे. हे लाकूड चंद्रपुरातून रवाना करण्यात आले आहे. देशातील सर्वोत्तम लाकूड म्हणून त्याची ओळख आहे.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वनविकास महामंडळाला हे सागवान पुरवण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्टने विनंती केली होती. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलातील अतिशय उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी निवडण्यात आले. या सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होत नाही. पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते. या सागवानात टेक्टॉनीन हा ऑइल कन्टेन्ट खूप जास्त आहे, त्यामुळे याला कीड लागत नाही आणि लाकडात खूप चमक असते. राममंदिरासाठी निवडण्यात आलेली सागाची झाडं किमान ८० वर्षांची आहेत. त्यामुळे लाकडात ग्रेन्सची संख्या जास्त आहे, यामुळे लाकडाला विशिष्ट प्रकारचा ब्राऊन रंग येतो आणि हे लाकूड नक्षीकाम केल्यावर खूप सुंदर दिसतं. हे सर्व लाकूड नॅचरल फॉरेस्टमधील असल्याने याला कीड लागत नाही आणि हे लाकूड खूप जीवट असते. सुमारे एक हजार वर्ष हे लाकूड टिकेल अशा दर्जाचे आहे.