नागपूर : क्रिकेटच्या विश्वातील देव अशी उपाधी मिळालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर गुरुवारी नागपुरात दाखल झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अंजली तेंडुलकरही होती. तेंडुलकर दरवर्षी कुटुंबासह चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देतो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक अभयारण्यांमध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. या सफारीसाठी खास सचिन आपल्या पत्नीसह आल्याचे सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सचिनने आज कुटुंबासह नागपूर गाठले. नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर सचिन थेट ताडोबासाठी रवाना झाला. क्रिकेटर सचिन तेंडुलकरला जंगल सफारीचे प्रचंड वेड आहे. काही दिवसांपूर्वी सचिनने उमरेड करंडला अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला होता. गुरुवारी सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा जंगल सफारीसाठी पोहोचला. त्याचे काही जवळचे मित्र देखील यावेळी हजर होते. सचिन आणि त्याचे कुटुंबीय नागपूरहून कारने ताडोबासाठी निघाले. सचिनच्या नागपूर विमानतळावर आगमनाची बातमी समजताच चाहत्यांची चांगलीच गर्दी झाली होती. विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सचिनची प्रेमाने भेट घेतली.