चंद्रपूर : कामाच्या व्यस्ततेत अनेकजण आश्वासनांची पूर्तता करण्यास विसरतात. सेलिब्रिटींच्या बाबतीत असे प्रकार नेहमीच घडतात, असा अनुभव आहे. मात्र, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलिझांझा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि स्कूल बॅग भेट देण्याचे आश्वासन दिले आणि ते पूर्णही केले.
दोन महिन्यांनंतर, तेंडुलकर दाम्पत्याने ताडोबातील अलिझांझा शाळेला दिलेल्या संस्मरणीय भेटीदरम्यान आपले वचन पाळले. शाळेतील विद्यार्थ्यांनाही त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूकडून ही भेट मिळाल्याने आनंद झाला आहे. हा भावनिक प्रसंग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलिझांझा शाळेत उपस्थित सर्वांनी पाहिला आणि अनुभवला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन महिन्यांपूर्वी अलिझांझा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला २१ फेब्रुवारी रोजी पत्नी अंजली आणि मित्रांसह वाघ सफारीसाठी ताडोबा येथे आले असता भेट दिली होती. चौथीच्या मराठी पुस्तकातील कोलाज या धड्यातून विद्यार्थ्यांनी सचिनचे चरित्र वाचले होते. विद्यार्थी त्याचे चरित्र वाचत असताना सचिन भावूक झाला होता. त्यानंतर सचिनची पत्नी डॉ.अंजली यांनी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग देण्याचे वचन दिले होते. विद्यार्थ्यांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजता सचिन व त्याची पत्नी डॉ. अंजली आणि आपल्या मित्रांसह जिल्हा परिषद शाळेत पोहोचले व विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके व दप्तरांचे वाटप केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
यावेही शाळेची रांगोळी, फुलांनी सजावट करण्यात आली होती. सचिन विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी येणार असल्याची अगोदर माहिती देण्यात आली होती. त्यादृष्टीने विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळी व फुलांनी शाळा सजवली होती. सचिन शाळेत दाखल होताच शाळेच्या विद्यार्थिनी व शिक्षिका मनीषा बावनकर यांनी लाकडी फळीवर पारंपरिक पद्धतीने पाय धुतले व पुष्पगुच्छ दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागूनच अलिझांझा गाव आहे. गावाची लोकसंख्या तीनशेच्या आसपास आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेटच्या वाटेवर आहे. सध्या या शाळेत १७ विद्यार्थी आहेत.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात याच मार्गावरून सफारीला जाताना सचिनने विद्यार्थ्यांना खेळताना पाहिले होते. गाडी थांबवून शाळेला भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सचिनच्या चरित्रावर आधारित इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकातून कोलाज नावाचा धडा वाचला होता. याची आठवण करून शुक्रवारी सचिनने पुन्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना शाळेच्या दप्तर व इतर साहित्य भेट दिले. १५ मिनिटे विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर सचिल मित्रांसह सफारीला रवाना झाला.