Mumbai : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका केली. राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळल्याने उपचार घेण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. तब्येत बरी झाल्यानंतर पुन्हा आंदोलन करेन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. यावर ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटलांना आम्ही खूप सहकार्य केलं, मदत केली, त्यांचा मान- सन्मान केला, मी स्वतः त्यांच्याकडे सहा वेळा गेलो. माझे सहकारी मंत्रीदेखील माझ्यासोबत होते. मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायमूर्तींना त्यांच्याकडे पाठवलं होतं. मुख्यमंत्री देखील त्यांना दोन वेळा भेटायला गेले होते. इतके प्रयत्न करूनही मनोज जरांगे ऐकायला तयार नाहीत असे गिरीश महाजन म्हणाले. जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्वकाही केलं. तरीदेखील मी म्हणेन तेच करा, नाही केल तर तुमचा सत्यानाश करेल, पक्ष संपवून टाकेल, तुम्हाला पदावरून खाली खेचेल अशी वक्तव्य जरांगे करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री तसेच छगन भुजबळ यांच्या बाबत चुकीचं भाष्य केलं. परवा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीवाचक शिविगाळ केली. त्यांचं नाव घेऊन आई-बहिणीचा उल्लेख केला. मनोज जरांगेंचे कृत्य माफी करण्याजोगे नाही असे परखड मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांचं अशा प्रकारे बोलणं महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्तीला आवडलेल नाही. मराठा बांधवांना देखील त्यांचं बोलणं पटलेल नाही. म्हणून जरांगेंनी आता त्यांच्या मर्यादेत बोलावं. त्यांना वाटत की मी आता महाराष्ट्राचा राजा झालो आहे. मी म्हणेन तेच योग्य, मी म्हणतोय तोच निर्णय घ्या. याला आरक्षण द्या, त्याला देऊ नका. तुमचा सत्त्यानाश करू, संपवून टाकतो. मोदी कसे येतात तेच बघतो. मोदींसह मोठ्या नेत्यांचा एकेरी उल्लेख केला जात होता. सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारची भाषा वापरली जाते का? असा प्रश्नही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे यांच्या डोक्यात हवा गेली आहे असे गिरीश महाजन बोलले. मोठी गर्दी पाहून मनोज जरांगे काहीही बोलू लागले आहेत. परंतु मराठा आरक्षणाचा विषय सोडून ते राजकारणावर आल्यामुळे लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे. राजकारण तुमचं काम नाही हे मी मनोज जरांगेंना सांगू ईच्छितो असे ग्रामविकास आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन म्हणाले.