नागपूर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘डीपी’ बदलण्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्यांना संघाने शब्दांनंतर कृतीतून प्रत्युत्तर दिले आहे. संघाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फोटो बदलत शनिवार, १३ ऑगस्ट २०२२ पासून तिरंगा ठेवला आहे.
स्वाधीनता का अमृत महोत्सव मनाएँ.
हर घर तिरंगा फहराएँ.
राष्ट्रीय स्वाभिमान जगाएँ. pic.twitter.com/li2by2b0dK— RSS (@RSSorg) August 13, 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला शनिवारपासून सुरुवात झाली. देशभरात सर्वच ठिकाणी नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा फडकविण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या व विरोधी पक्षातील नेत्यांनीही आपला डीपी बदलत त्याजागी तिरंगा ठेवला होता. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डीपी बदलला नाही, असे नमूद करीत विरोधकांनी संघावर टीका करण्यास सुरुवात केली होती. अशात १३ ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला प्रारंभ होताच, संघाने ट्विटरसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील डीपी बदलला. डीपी बदलण्यासोबतच संघाने सकाळी सव्वासहा वाजता एक व्हिडीओही पोस्ट केल्या, ज्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ध्वजारोहण करताना दिसत आहेत. संघाने देशातील प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन या व्हिडीओतून केले आहे.