Home » संघाच्या राष्ट्रीय समन्वय समिती बैठकीत देशहितावरच विचारमंथन : वैद्य

संघाच्या राष्ट्रीय समन्वय समिती बैठकीत देशहितावरच विचारमंथन : वैद्य

by नवस्वराज
0 comment

रायपूर (छत्तीसगड) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीत केवळ राष्ट्रहिताच्याच मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक संस्था, संघटना संघाशी जुळलेल्या असल्या तरी त्या स्वायत्त आहेत. त्यांच्या निर्णय स्वातंत्र्यावर संघ कधीही दबाव आणत नाही, उलट या सर्व संस्था, संघटनांच्या मदतीने व समन्वयाने राष्ट्रहिताचे काम कसे करता येईल यावरच भर दिला जातो. याच हेतूने छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आयोजित समन्वय समितीच्या बैठकीतही अनेक मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह (भोपाळ) मनमोहन वैद्य यांनी सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ रोजी ही दिली.

कोविड महासाथीनंतर जगभरातील परिस्थिती बदलली आहे. बदलत्या परिस्थितीनुसार भारताला नव्या पद्धतीने अधिक सक्षम, स्वावलंबी, एकसंघ कसे करता येईल, अशा अनेक मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर, अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख (दिल्ली) नरेंद्र कुमार, अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख (राची) आलोक कुमार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ३६ संघटनांचे पदाधिकारी समन्वय समितीच्या बैठकीत सहभागी झाल्याचे वैद्य यांनी सांगितले.

भारताला अधिक शक्तीशाली बनवायचे असल्यास नवीन भारताची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे चर्चेतून पुढे आल्याचे वैद्य म्हणाले. श्रीराम यांनी उत्तर-दक्षिण प्रवास केला. श्रीकृष्णांनी पूर्व-पश्चिम कार्य केले. शिव सर्वत्र असल्याने संपूर्ण देशाला एकसंघ कसे ठेवता येईल, यावर गहन चर्चा समन्वय समितीच्या बैठकीत झाली.

भारतात पाश्चात्य ब्रान्डेड उत्पादनांचे फारच वेड आहे. हा पैसा प्रसंगी नंतर भारताच्याच अहितासाठी वापरला जातो. त्यामुळे ग्राहक पंचायतने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. स्वदेशीतून देशातील पैसा देशात फिरेल यातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. भारतीय मानक इंडेक्स तयार करण्याचीही गरज प्रतिपादित करण्यात आली. भारत कृषीप्रधान अर्थव्यवस्था असताना कृषी शिक्षण प्रणालीत अमुलाग्र बदल गरजेचा असल्याबद्दलही चर्चा झाली.

आरोग्य भारतीने देशातील विद्यापीठांमध्ये वस्तुस्थितीजन्य व विज्ञानाधारीत हिंदुत्व शिक्षणाची गरज नमूद केली. भारतीय भाषांमध्ये शासकीय कामकाज चालावे. इंग्रजीवरच भर देण्यात येत असल्याने देशातील अनेक गरीब, अल्पशिक्षित मुख्य प्रवाहात आलेले नाही. त्यामुळे इंग्रजीचेच वेड कायम न ठेवता स्थानिक भाषांवर भर दिला पाहिजे यावरही चर्चा झाली. रोजगारासाठी नागरिकांचे स्थलांतर थांबविणे हा देखील चर्चेतील प्रमुख मुद्द्यांपैकी एक होता. बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतील अनेक मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम व्यापक होत आहे, असे वैद्य यांनी सांगितले. देशभरात कोविडनंतर संघाच्या शाखांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जगभरात स्वयंसेवकांच्या संख्येतही वाढ होत आहे. सव्वा लाख लोक ऑनलाईन माध्यमातून संघाशी जोडले गेले. त्यांनी संघ ‘ज्यॉईन’ केला आहे. एकट्या २०२२ मध्ये आतापर्यंत ९० हजार लोक ऑनलाईन नोंदणीकृत झाले आहेत, असेही वैद्य यांनी सांगितले.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेबद्दल प्रसार माध्यमांनी विचारल्यानंतर वैद्य म्हणाले, भारतला जोडणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच आहे. परंतु भारताला जोडताना कोणत्याही जातीधर्माबद्दल, पंथाबद्दल, संघटनेबद्दल, संस्कृतीबद्दल ईतर लोकांच्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. संघ आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना ‘मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाच्या विचारांशी लोक जोडले जात आहेत. भारताला हिंदुराष्ट्र करण्याची गरज नाही, ते मुळातच हिंदुराष्ट्रच आहे’, असे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!