Ashvin Pathak | अश्विन पाठक
Mumbai : रेल्वे सुरक्षा बलाकडे (RPF) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत मुलांना गैरप्रकारांपासून वाचविण्याची जबाबदारीही रेल्व सुरक्षा बल योग्य पद्धतीने पार पाडत आहे.
मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने 655 मुले आणि 303 मुलींसह 958 मुलांची मध्य रेल्वे फलाटांवरून (Platform) सुटका केली आहे. यात चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.
घरगुती भांडण, कौटुंबिक समस्या, उच्च जीवन जगण्याचे स्वप्न, सिनेक्षेत्राचे आकर्षण, मोठ्या शहराचा झगमगाट या व अशा अनेक कारणांमुळे मुले आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येतात. प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या निदर्शनास अशी मुले आल्यावर प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यांना त्यांच्या पालकांसोबत पुन्हा एकत्र येण्याचा सल्ला देतात.
रेल्वे सुरक्षा बलाच्या या सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली. मध्य रेल्वेच्या एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान सुटका झालेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन करण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक 289 मुलांची सुटका केली. त्यात 175 मुले आणि 114 मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने 270 मुलांची सुटका केली. त्यात 169 मुले आणि 101 मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने 206 मुलांची सुटका केली असून त्यात 198 मुले आणि 08 मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागाने 132 मुलांची सुटका केली असून त्यात 76 मुले आणि 56 मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने 61 मुलांची सुटका केली असून त्यात 37 मुले आणि 24 मुलींचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी 2024 मध्ये 35 मुले आणि 21 मुलींसह 56 मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात 27 मुलांची सुटका करण्यात आली आहे.