नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या टीममध्ये राजस्थानातील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी पंकज सिंह यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. ते उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कामकाज पाहतील. पंकज सिंह यांनी काम करताना अनेक मोठ्या गोष्टींचा छडा लावून गुन्हेगार, तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती करून डोवाल यांनी मोठा डाव टाकल्याचे बोलले जात आहे.
पोलिस अधीक्षक ते अतिरिक्त पोलिस महासंचालक पदापर्यंत सिंह यांनी काम केले आहे. १९८८ बॅचचे सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. सीमा सुरक्षा दलातून ते अतिरिक्त महासंचालक म्हणून गेल्या महिन्यातच निवृत्त झालेत. जोधपूरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक, ढोलपूरचे पोलिस अधीक्षक, राज्यपालांचे एडीसी, जयपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, भिलवाडा पोलिस अधीक्षक, जयपूर सीआयडीचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सीबीआयमध्येही पोलिस अधीक्षक म्हणून ते कार्यरत होते. जयपूर रेंजचे आयजी, कायदा व सुव्यवस्था विभागाचे आयजी, सीआरपीएफचे आयजी आणि सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले. सिंह यांचे वडिलांना पद्मश्रीह पुरस्कारही मिळाला आहे.