Home » देवभूमी भारताचे रक्षण करण्यासाठी साधना करण्याचा निश्चय करा : सुनंदा हरणे

देवभूमी भारताचे रक्षण करण्यासाठी साधना करण्याचा निश्चय करा : सुनंदा हरणे

by नवस्वराज
0 comment

अकोला : केवळ जन्माने हिंदू असून चालत नाही, कर्माने हिंदू असणे अधिक महत्त्वाचे आहे, असे परखड मत सुनंदा हरणे यांनी जानोरकर मंगल कार्यालयात सनातन संस्थे तर्फे ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. व्यासपिठावर सुनंदा हरणे, उदय महा, संजय ठाकूर, मुकुंद जालनेकर, श्रीराम पांडे, गुणवंतराव जानोरकर होते. कार्यक्रमाची सुरूवात श्री व्यासपूजन तसेच भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. हिंदु धर्मामध्ये ३६५ दिवसांपैकी साधारणपणे १५० दिवस सण – उत्सव – व्रत – वैकल्ये असतात. हे धर्मशास्त्राप्रमाणे साजरे केले तर कुटुंबियांवर योग्य धर्मसंस्कार होतील, कुटुंबातील मुलांचे मन धर्मपरायण होईल. धर्म हा आचरणशील असतो, धर्माचरण केले, साधना केली, तरच खर्‍या अर्थाने धर्माचे आणि आपलेही रक्षण होते. साधनेमुळेच आंतरिक दिव्य ऊर्जा जागृत होते, मनोबल वाढते, आत्मशक्ती जागृत होते. याच दिव्यशक्तीच्या आधारे हिंदु धर्माचे, देवभूमी भारताचे रक्षण सहजसुलभ होणार असून देवभूमी भारताचे रक्षण आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंनी साधना करण्याचा जाणीवपूर्वक निश्चय करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या सुनंदा हरणे यांनी या वेळी केले.

देशभरात ७२ ठिकाणी, गुरूपौर्णिमा प्रित्यर्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हिंदू आपल्या संस्कृती पासून दुरावले असल्यामुळे मंदीर व्यवस्थापन तसेच हिंदू संघटनांना मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता संदर्भात फलक लावावे लागत आहेत, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते. हिंदूंमधील धर्म आणि संस्कार शिक्षणाबाबतची उदासीनता यासाठी कारणीभूत असल्याचे विचार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तथा औषधी व्यवसायिक संघटनेचे राष्ट्रीय संघटनमंत्री उदय महा यांनी या प्रसंगी व्यक्त केले. स्वसंरक्षणा संबंधी प्रात्यक्षिकांचा लघुपट यावेळी दाखवण्यात आला. मराठी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलुगु या सहा भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाले. या माध्यमांतून देश – विदेशांतील भाविकांनी गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घेतला. सनातन संस्थेच्या मराठी भाषेतील ‘अध्यात्माचे प्रास्ताविक’ या ई-बुकचे प्रकाशन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धर्मप्रेमी तसेच जिज्ञासूंची उपस्थिती होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!