नागपूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा दिवसात जुन्या प्रलंबित आणि नव्या अशा दोन लाख तक्रारींचे निवारण केले. त्याच सोबत बिलांबाबतच्या एक लाख ४२ हजार तक्रारींचे निवारणही दहा दिवसात युद्ध पातळीवर करण्यात आल्याचा दावा मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने केला.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहक हा केंद्रबिंदू मानून सेवा देण्याची सूचना कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वीज पुरवठा बंदच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचा स्पष्ट आदेश दिला. पावसाळी हवामानात वीज पुरवठा बंद झाल्याच्या तक्रारी वाढू शकतात हे ध्यानात घेऊन काम करण्यास सांगितले. त्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून दहा दिवसात वीज पुरवठा बंदच्या दोन लाख तक्रारींचे निवारण केल्याचा दावा महावितरणने केला आहे.
गेल्या दहा दिवसात नव्याने दाखल झालेल्या वीज पुरवठा बंदच्या १३८०७२ तक्रारींचे निवारण करण्यात आले. त्यासोबत आधीच्या प्रलंबित ६७००० तक्रारीही निकाली काढण्यात आल्या. वीज पुरवठा बंदच्या तक्रारींचे निवारण करताना या तक्रारी लवकरात लवकर म्हणजे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या काल मर्यादेत दूर व्हाव्यात यावर भर देण्यात येत आहे. बिलांच्या बाबतीत एकूण १४२६०० तक्रारींचे दहा दिवसात निराकरण करण्यात आले. त्यापैकी ११०९२० तक्रारी २० जूनपूर्वी दाखल झालेल्या होत्या. त्यासोबत २० जूननंतरच्या ३१८६७ तक्रारींचेही निराकरण करण्यात आले. यामध्ये बिल दुरुस्तीच्या ४३४६० तक्रारींचे निवारण समाविष्ट आहे.