अकोला : अत्यंत दुर्मीळ ‘मांडूळ’ जातीचा साप एका शेतात आढळून आला होता. सर्पमित्रांनी त्याला पकडून जंगलात सोडून दिले. अकोला शहरापासून जवळ असलेल्या भाकराबाद (मोरगाव भाकरे) येथील धीरज पाटील यांना शेतात साप दिसला.
सर्पमित्र सुरज इंगळे, सुरज ठाकूर, अभय निंबाळकर यांनी त्वरित घटनास्थळी पोहचून मांडूळ सापाला पकडले. हा साप तीन फूट लांबीचा होता. या मांडुळ सापाची वन विभागात नोंदणी करून पातूर वन परिक्षेत्रात सोडून देण्यात आले. दुर्धर आजारावरील औषंधासाठी तसेच गुप्त धनाच्या शोधासाठी मांडूळ जातीच्या सापाची आंतरराष्ट्रीयस्तरावर तस्करी होते. मांडूळ उपद्रवी नसणारा बिनविषारी साप आहे. त्याच्या मातीमिश्रीत विष्टेमुळे जमीन सुपिक व भुसभुशीत होत असल्याने शेती पिकाच्या उत्पादनात वाढ होत असल्याने मांडूळाला शेतकऱ्याचा मित्र संबोधले जाते.
मांडूळ सापाची मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव असून तो बिनविषारी आहे. अंधश्रद्धेमुळे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.