अकोला : विशेष रेल्वे गाड्यांना दक्षिण मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मुदतवाढ न दिल्याने ऐन उत्सवाच्या काळात अकोल्यातील रेल्वे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे.
पूर्णा-अकोला मार्गावरील ओखा, व्दारका, सोमनाथ यांना आणि दक्षिण भारतातील नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, हैदराबाद या शहरांना जोडण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेकडून काचीगुडा-बिकानेर, ओखा-मदुरै, हैदराबाद-जयपूर विशेष, राजकोट ते महबूबनगर (तेलंगणा) दरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू केल्या होत्या. या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना आता मुदतवाढ देण्यात आलेली नाही. रेल्वेगाड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
या विशेष रेल्वेगाड्यांमुळे हजारो भाविकांना ओखा, व्दारका, सोमनाथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, शेगाव येथील गजानन मंदिर, औंढा नागनाथ, हिंगोली येथील आठवे ज्योतिर्लिंग, नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा, बासर येथील सरस्वती मंदिरकरिता सोय झाली होती. अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी, निजामाबाद, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांना गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, जयपूर येथे जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी मिळाल्याने त्याचा सर्वाधिक फायदा व्यापाऱ्यांना झाला.
पहिल्या फेरीपासूनच या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल होते. प्रचंड प्रतिसाद मिळूनही रेल्वे खात्याकडून अद्याप या विशेष गाड्यांचा अवधी वाढवण्यात आला नाही. रेल्वेगाड्या बंद झाल्यास व्यापारी, भाविक आणि प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागेल. रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देऊन विशेष जागी कायमस्वरुपी करण्याची मागणी व्यापारी आणि हिंदू भाविकांनी केली आहे. ट्रेन कायमस्वरुपी केल्याने ट्रेन उशिराने धावण्याला आळा बसेल, तिकिटाचे दरही कमी होतील. त्याचा व्यापारी आणि भाविकांना फायदा होईल. रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी विभागातील खासदारांसह डीआरयूसीसी सदस्य राकेश भट्ट, वाशीमचे महेंद्रसिंग गुलाटी, अकोल्याचे ॲड.सुभाषसिंह ठाकूर, ॲड. अमोल इंगळे, अतुल जैस्वाल यांनी केली आहे.