Akola | अकोला : आपल्याला जो इतिहास शिकविण्यात आला आहे, तो चुकीचा आहे. सत्य जाणीवपूर्वक दडपून टाकण्यात आल्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले. राष्ट्र जागृती मंचतर्फे 25 डिसेंबरला मुंगीलाल बाजोरीया विद्यालयाच्या मैदानात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सुवासिनींनी त्यांचे ओवाळून स्वागत केले, दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांचा यावेळी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ म्हणाले की, हेतूपूर्वक इतिहासातील सत्य दडपून सनातनी हिंदूचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले. इतिहास विकृत करून शिकवण्यात आला. सनातनी हिंदूंच्या विरोधात हे मोठे षडयंत्र आहे. इंग्रजी भाषा आपल्यावर थोपण्यात आली. आपले ॠषीमुनी वैद्यकशास्त्र, औषधीशास्त्र, विज्ञान आदी विषयात पारंगत होते. आपल्या देशाचे स्वातंत्र्य सैनिक, हिंदू राज्यांच्या पराक्रमाच्या कथांऐवजी देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या परकीय आक्रमकांचा उदोउदो करण्यात येतो. (Pushpedra Kulsreshtha In Akola Said Fact Of Indian History Was Deliberately Suppressed)
15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले नसून ते सत्तेचे हस्तांतरण होते. काँग्रेस ईव्हीएम मशिन (EVM) हॅक करण्यात येत असल्याचा ओरडा करते. हॅकिंगची सुरुवात तर काँग्रेस पक्षानेच सुरू केली. 1946 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांना 15 पैकी 12 मते, आचार्य कृपलानी यांना केवळ एक मत मिळाले. दोन मतदारांनी त्यावेळी देखील ‘नोटा’ पर्याय स्वीकारला. असे असताना सरदार पटेल यांना डावलत मर्जीतल्या व्यक्तीला अध्यक्ष बनवण्यात आले. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई, जातपात हे मुद्दे बाजूला ठेवत सनातन हिंदूंचे खच्चीकरण करणारे तसेच देशाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांच्या विरोधात मतदान केले.
‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) हा शब्द केरळ उच्च न्यायालयामुळे प्रचलित झाला आहे. कुलश्रेष्ठ यांनी याबाबत उपस्थिती पालकांना मुलांशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात, भौतिकवाद आणि चंगळवादाच्या नादात पालक आणि पाल्यातील संवाद खुंटल्यामुळे असे प्रकार वाढत असल्याचे मत व्यक्त केले. दिल्लीच्या इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा, 75 स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे बसविले जाणार आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा देखील असेल, अशी माहिती त्यांनी दिली. घटनेत सेक्युलर (Secular) हा शब्द समाविष्ट करण्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. सनातनी हिंदूंनी सत्याच्या बाजूने उभे राहावे, सत्याची साथ देणाऱ्यांना एकटे पडू देऊ नये, असे आवाहन पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. तीन तास चाललेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश काबरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय जागृती मंचाच्या सदस्यांनी सहकार्य केले.