नागपूर : जानेवारी महिन्यातील ३१ तारीख ही महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून महाराष्ट्राला आता राज्यगीत मिळाले आहे. हे गीत अनेकांनी विविध कार्यक्रमांमध्ये ऐकले असेल परंतु हेच महाराष्ट्राचे राज्यगीत होईल, असा विचारही कुणी केला नसेल. हे गीत महाराष्ट्राला देणारे कवी राजा बढे विदर्भातील असून त्यांचा जन्म नागपुरात झाला आहे.
– प्रसन्न जकाते
१ फेब्रुवारी १९१२ हा कवी राजा बढे यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिवसालाच महाराष्ट्राला हे गीत मिळाले आहे. ही खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आहे. नागपुरातीहल टिळक विद्यालयात शिक्षण झाल्यानंतर कवी राजा बढे पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक झालेत. पुण्याच्या दैनिक सकाळमध्ये त्यांनी पत्रकारिता केली. नागपुरातील दैनिक महाराष्ट्र, बागेश्वरी मासिकातही होते. मुंबई आकाशवाणीतील संगीत विभागात निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील एका चित्रपटातही त्यांनी काम केले. चांदणे शिंपीत जाशी, जय जय महाराष्ट्र् माझा हे त्यांचे गाणे अजरामर झाले. शाहीर साबळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे प्रथम यशवंतराव चव्हाण यांच्यापुढे गायले गेले. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.
महाराष्ट्र १२वे राज्य
कोणत्याही देशाला त्याचे राष्ट्रगीत असते. काही राज्यांना स्वत:ची राज्यगीतेही असतात. आतापर्यंत देशातील ११ राज्यांना त्यांचे राज्यगीत आहे. आता महाराष्ट्रही या यादीत समाविष्ट झाला आहे.