Home » लोणार सरोवराकाठी बंदी मोडून आंदोलकांनी केलं स्नान

लोणार सरोवराकाठी बंदी मोडून आंदोलकांनी केलं स्नान

by नवस्वराज
0 comment

बुलढाणा : जगप्रसिद्ध  लोणार सरोवर परिसरात असलेल्या धारातीर्थ या पवित्र ठिकाणी भाविकांना स्नानासाठी घालून दिलेली बंदी पुरातत्त्व विभागाने उठवावी या मागणीसाठी लोणार सरोवराच्या काठावर असलेल्या धारातीर्थ या पवित्र स्थानी शिवसेना ठाकरे गट आणि सामाजिक संघटना यांनी आंदोलन केले.

पुरात्व विभागाने घातलेली बंदी मोडत या तीर्थक्षेत्राच्या भोवती लावलेले बेरीकेटस तोडून या ठिकाणी आज स्नान आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने आंदोलनात सामील झाल्या. लोणार सरोवराच्या परिसरात अनेक पुरातन मंदिर आहेत. या परिसरात सरोवराच्या काठावर एक भगवान विष्णू आणि महादेवाचं ही प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या खाली एक गोमुख आहे, ज्यातून वर्षभर अविरत पाण्याची भली मोठी धार पडत असते. त्यामुळे याला धारा तीर्थ म्हणून ओळखलं जातं.

पाण्याच्या धारेखाली स्नान केल्यास अनेक दुर्धर आजारही बरे होतात अशी भावना काही भक्तांची आहे. त्यामुळे दूरवरच्या ठिकाणावरून भाविक या धारातीर्थी पवित्र स्नान करण्यासाठी येत असतात. मात्र, लोणार सरोवर हा जागतिक वारसा असल्याने आणि परिसरातील वास्तूंचं जतन करण्यासाठी हा परिसर केंद्रीय पुरातत्व विभागाने आपल्या देखरेखीत घेतला आहे. कोरोना काळात पुरातत्व विभागाने या ठिकाणी स्नान करण्यास बंदी घातली होती. आता कोरोना संपुष्टात आला असूनही ही बंदी कायम असल्याने याठिकाणी भाविकांना स्नान करण्यास मज्जाव करण्यात आला.

स्थानिक संघटना तसेच भाविकांच्यावतीने अनेकदा निवेदने देऊन ही बंदी मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पुरातत्व विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज लोणार परिसरातील हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, काही सामाजिक संघटनांनी आंदोलन करत ही बंदी मोडीत काढली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!