बुलडाणा : शेतकऱ्यांच्या मागण्यासांठीची लढाई सुरुच राहणार आहे. पुढच्या महिन्यात जिजाऊंचे दर्शन घेऊन आधी जिल्हाभर यात्रा काढणार आणि नंतर राज्यात यात्रा काढणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. आपल्याला राजकीय जीवनातून संपवण्याचा कट असून जिवाला धोका असल्याचा आरोपही तुपकर यांनी केला.
सत्ताधाऱ्यांनी पक्षातील काही नेत्यांच्या सांगण्यावरुन आत्मदहन आंदोलन दडपण्यात आले. लाठीचार्ज हा पूर्वनियोजित होता. सरकारने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर हेतुपुरस्सरपणे चुकीचे गुन्हे दाखल केले, अगदी नक्षलवाद्यांसारखी वागणूक देण्यात आली. तुरुंगात टाकले परंतु तरीही आम्ही थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यासांठीची लढाई सुरुच राहणार आहे, असे तुपकर यांनी सांगितले.
अतिवृष्टीची मदत, पिकविमा, सोयाबीन – कापसाला भाव यासह इतर मागण्यांसाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून लढा देत आहोत. ६ नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा, २४ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईत जलसमाधी आंदोलनाची धडक दिली. जलसमाधी आंदोलनामुळे राज्य सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी, पाठपुरावा सुरुच होता परंतु त्याउपरही न्याय मिळत नसल्याने आत्मदहन आंदोलनाचा निर्णय घेतला होता.
या आंदोलनात पोलिसांच्या वेशात नव्हे तर फक्त खाकी कपड्यांमध्ये आलो होतो. अंगावर डिझेल घेतल्यावरही पोलिसांनी ताब्यात घेणे, अटक करणे, दवाखान्यात नेणे यापैकी कोणताच निर्णय न घेता दोन तास उन्हात बसवून ठेवले. एकदा मारहाण झाली, तुरुंगात टाकले की पुन्हा आंदोलन करणार नाही, असा सत्ताधाऱ्यांचा आणि पोलिसांचा समज आहे. परंतु आम्ही थांबणार नाही. सत्ताधाऱ्यांनी आणि पोलिसांनी किती अन्याय केला हे आता जिल्हाभर यात्रा काढून गावागावात सांगणार असल्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली.