Home » Nitin Gadkari : नागपुरात का झाली भाजपच्या दिग्गज मंत्र्याविरोधात निदर्शने

Nitin Gadkari : नागपुरात का झाली भाजपच्या दिग्गज मंत्र्याविरोधात निदर्शने

Protest For Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्याचे आश्वासन न पाळल्यामुळे संताप

by नवस्वराज
0 comment

Nagpur : ‘वादा निभाओ-विदर्भ राज्य बनाओ’ अशा घोषणा देत ‘जय विदर्भ पार्टी’ने नागपूरच्या व्हरायटी चौकात निदर्शने केली. आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले कि, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी 2014 मधील निवडणुकीपूर्वी केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत आल्यास 100 दिवसात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे लेखी स्वरुपात आश्वासन दिले होते. आश्वासन देऊन 10 वर्षे लोटली तरी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीबद्दल भाजपचा एकही नेता संसदेमध्ये प्रश्न उचलून धरत नाही.

आंदोलकांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, लेके रहेंगे- के रहेंगे-विदर्भ राज लेके रहेंगे, अभी तो यह अंगडाई है-आगे घोर लढाई है, लढेंगे -जितेंगे, केंद्र शासन मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. सरकारची प्रतिकृती म्हणून सदाफुलीचे (बेशरम) झाड दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जय विदर्भ पार्टीचे अध्यक्ष अरुण केदार म्हणाले की, मोदी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. परंतु त्यांनी वैदर्भीय जनतेची दखल घेतली नाही. किमान सात शेतकरी विदर्भात आत्महत्या करीत आहेत. यवतमाळ हा आशिया खंडातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेला जिल्हा आहे. यावर पंतप्रधानांनी एकही शब्द बोलू नये, हा वैदर्भीय जनतेचा, शहीद शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. केदार पुढे म्हणाले की, 100 दिवसात वेगळे विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देऊनही, वैदर्भीय जनतेला स्वतंत्र राज्याची मागणी करावी लागत आहे हे दुर्दैव आहे.

पंतप्रधान मोदी भाषणातून आपल्या ‘गॅरंटी’चा प्रचार करतात. ते दिलेले आश्वासन विसरून नव्या आश्वासनांची खिरापत वाटत आहेत. कार्यकर्त्यांनी सज्ज होऊन भाजपला विदर्भातून हद्दपार करावे. वैदर्भीय जनतेच्या जय विदर्भ पार्टीला सत्तेत आणावे, असे आवाहन अध्यक्ष अरुण केदार यांनी केले. पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी भाजपला त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील 1997 मधील भुवनेश्वर येथील ठरावाची आठवण करुन दिली. वेगळे विदर्भ राज्य तत्काळ निर्माण करावे अन्यथा भाजपची कोंबडीसुद्धा विदर्भात अंड देणार नाही, अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू असा इशारा उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी यावेळी दिला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!