अमरावती : अमरावती शहरात महापालिका प्रशासनाने राबविलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे भाजप मधील नेत्यांच्या दोन परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटल्याने चर्चेला उधाण आले आहे.
अमरावती शहरात दोन दिवसांपासून महापालिकेच्यावतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येत आहे. महापालिकेच्या या मोहिमेला माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी विरोध व्यक्त केला. हा विरोध व्यक्त करताना पोटे यांचा महापालिका अधिकाऱ्यांशी वाददेखील झाला. पोटे यांच्या अगदी विरुद्ध प्रतिक्रिया खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केली. डॉ. बोंडे यांनी अतिक्रमण हटविल्याबद्दल महापालिका प्रशासनाचे आभार मानले. एकाच पक्षातील दोन नेत्यांच्या या दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमध्ये वाद सुरू असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे, तर भाजपच्या अन्य नेत्यांनी हा दावा फेटाळला आहे.