Wardha : गांधी, विनोबा भावेंच्या जिल्ह्यात दारूबंदी असली तरी येथे दारूचा महापूर वाहत होता. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले होते. विषारी मद्य प्राशन केल्यामुळे गावातील चार युवकांचा बळी गेला होता. त्यामुळे गावकरी संतप्त झाले होते. गावकऱ्यांच्या दबावामुळे ग्रामपंचायत सभागृहात पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
दारूबंदी असूनही गावात देशी-विदेशीसह हातभट्टीची विषारी दारू विकल्या जाते. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात ? याला आवर कोण घालणार? असा संतप्त सवाल महिलांनी बैठकीत उपस्थित केला. पत्रकारांना बातमी दिल्यास धमक्या देण्यात येतात. सभेला हजर असलेले पोलीस निरीक्षक विनीत घागे यांनी तक्रारी ऐकून दिलगिरी व्यक्त करून, कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अवैध मद्य विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे सूरू केले. गावठी दारू विक्रेत्यांना पकडून त्यांच्या डोक्यावर दारूची टाकी ठेऊन त्यांना गावातून फिरविण्यात आले. या घटनेमुळे अवैध मद्य विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. बेकायदेशीर दारू विकताना कुणी आढळून आल्यास पोलिसांना फोन करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे, ग्रामपंचायत सदस्य रामू मगर यांनी सांगीतले. यापूर्वीही पोलीसांनी सभा घेऊन दारूबंदी करण्याचे आश्वासन देत कारवाई केली होती. मात्र चार महिन्यातच पुन्हा गावात दारूचा पूर वाहू लागला. यावेळी तसे होवू नये अशी अपेक्षा सरपंच शालिनी आदमने यांनी व्यक्त केली. माजी पं. स. सदस्य प्रमोद लाडे यांनी दारू विक्री कायमची बंद करण्याचे आवाहन केले. वर्धा-नागपूर हे अंतर कमी असल्याने पवनार गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येते, असे गावाकऱ्यांनी सांगीतल्यावर पोलिसांनी गस्त ठेवून ही समस्या निकाली काढण्याची हमी दिली. पोलीस निरीक्षक घागे यांनी यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे.