अकोला : निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये, अशी जनहित याचिका मुंबई येथील रोहण पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे ही माहिती दिली.
गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात आल्या नाहीत. हा देशद्रोह आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २४ महानगरपालिका व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून घेण्यात आल्या नाहीत. ओबीसीच्या मुद्यावरून निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणारा विकास रखडला आहे. गेली दोन वर्षे विविध कारणाने या निवडणुका लांबणीवर ढकलल्या जात आहेत. हा देशद्रोह आहे आणि त्यासाठी निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये, अशी जनहित याचिका पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर २७ फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.