अमरावती : भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याविरोधात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दंड थोपाटले आहेत. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमच्या जाहिरातीत भाग घेत असल्याने त्याचा निषेध म्हणून बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. थेट सचिन यांच्या घरासमोरच प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.
सचिन यांनी या जाहिरातीतून माघार घ्यावी म्हणून बच्चू कडू यांनी सचिन यांना १५ दिवसाचा अल्टिमेटमही दिला आहे. बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. ते भारतरत्न आहेत आणि भारताचे अभिमान आहेत. त्यांनी या ऑनलाईन गेममध्ये चुकूनही त्यांचा फोटो असलेले कुठे पोस्टर वगैरे आहे की नाही हे तपासलं पाहिजे. तसेच त्या ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ही आमची विनंती आहे. ते नाही झालं तर आम्हाला पर्यायी मार्ग शोधावा लागेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.