अकोला : मूर्तिजापूर येथील दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आमदार अमोला मिटकरींविरोधात तक्रार केली आहे. राकाँच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी ही तक्रार केली आहे.
आमदार मिटकरी यांच्याकडुन निधी मिळत नाही. निधी दिला तरी त्यावर कमिशन मागितले जात असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्षांसमोर करण्यात आला. त्यामुळे अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोर वाचण्यात आलेल्या तक्रारींचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या सुमन भास्कर गावंडे यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल गावंडे यांनी हे आरोप केले आहेत. एकट्या कुटासा गावासाठी मिटकरी यांनी १६ कोटी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कुटासातून राष्ट्रवादीची पिछेहाटही झाली होती.
आमदार मिटकरी यांनी त्यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाही. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे व प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चेनंतर यावर तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले. आमदार मिटकरी यांच्या समर्थकांनीही त्यांच्यावरील आरोप अयोग्य असल्याचे नमूद केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बैठकीत यामुद्द्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.