Home » Pakistan Assembly Election : देशाच्या पाठीत खंजीर खुपसला : लियाकत अली चट्टा 

Pakistan Assembly Election : देशाच्या पाठीत खंजीर खुपसला : लियाकत अली चट्टा 

Election Scam : सार्वत्रिक निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप

by नवस्वराज
0 comment

Rawalpindi : पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत गडबड झाल्याचा ओरडा होतो आहे. वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवर दररोज यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध होत आहेत. एका वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने शनिवारी याची कबुली दिली आहे. या अधिकाऱ्याने मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांवर निवडणुकीत गडबड केल्याचे आरोप केला आहे. निवडणुकीत झालेल्या चुकीच्या कामाची जबाबदारी स्वीकारून या अधिकाऱ्याने पदाचा राजीनामा दिला आहे. लियाकत अली चट्टा असे या निवडणूक अधिकाऱ्याचे नाव आहे.

8 फेब्रुवारीला इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षांनी निवडणुकीत गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानी जनतेने त्यांच्या पक्षाला दिलेला कौल बदलवल्याबद्दल पक्षाने देशभरात आंदोलन सुरू केले आहे. यामुळे माजी निवडणूक अधिकारी लियाकत अली चट्टा यांनी घेतलेली भूमिका महत्वपूर्ण मानली जाते. रावळपिंडीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चट्टा म्हणाले की, निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले होते, त्यांना आम्ही विजयी केले. निवडणुकीत झालेल्या गडबडीची मी जबाबदारी स्वीकारतो. मुख्य निवडणूक आयुक्त आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देखील यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘देशाच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे मला रात्री झोपही येत नाही मी केलेल्या चुकीच्या कामाची शिक्षा मला मिळाली पाहिजे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे’, असे चट्टा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ‘माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मी आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु हिंमत करून सत्य जनतेसमोर मांडत आहे. नोकरशहांनी राजकीय नेत्यांसाठी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करू नये’, असे आवाहनही त्यांनी केले. आपण केलेल्या चुकीच्या कामासाठी मृत्युदंडाची शिक्षा दिली जावी, असेही लियाकत अली चट्टा म्हणाले.

पाकिस्तानच्या मुख्य निवडणूक आयोगाने एका निवेदनाद्वारा लियाकत अली चट्टा यांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. निवडणुकीचे निकाल बदलले जावेत, असे कोणतेही निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले नाहीत, असे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!